विशेष प्रतिनिधी: आजरा
येथील श्री रवळनाथ मंदिर देवस्थान उप-कमिटीच्या वतीने मंदिर बांधकामासाठी कार्यरत असलेल्या सर्व कारागिरांना दीपावली सणानिमित्त फराळ आणि अभ्यंगस्नानाच्या साहित्याची भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सणासुदीच्या काळात घरापासून दूर राहून मंदिराच्या जीर्णोद्धार व बांधकाम सेवेत योगदान देणाऱ्या कारागिरांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
श्री रवळनाथ मंदिराचे बांधकाम सध्या वेगाने सुरू असून, अनेक कारागीर अहोरात्र काम करत आहेत. या कारागिरांची दिवाळी गोड व्हावी व त्यांना सणाचा आनंद घेता यावा, या सामाजिक भावनेतून उप-कमिटीने या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व कामगारांना दिवाळी फराळाचे पाकीट तसेच उटणे, तेल व अभ्यंगस्नानाचे आवश्यक साहित्य वाटप करून दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमावेळी उप-कमिटीचे अध्यक्ष आनंदराव कुंभार, उपाध्यक्ष सुजीत देसाई, खजिनदार (ट्रेझरर) मल्लिकार्जुन तेरणी, डॉ. दीपक सातोसकर, दीपक कुरूणकर आणि सुभाष नेवगी यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. देवस्थानच्या या संवेदनशील व कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.