आजरा (प्रतिनिधी):
"मनोरुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा" मानून समाजाने नाकारलेल्या, रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडलेल्या मनोरुग्णांना (मनोयात्री) नवे जीवन देण्याचे अत्यंत खडतर आणि संवेदनशील कार्य आजरा तालुक्यातील पेरणोली गावचा तरुण अमित वसंत प्रभा अविरतपणे करत आहे. स्वतःच्या सुखसोयी आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांवर पाणी सोडून त्याने आत्तापर्यंत शेकडो मनोयात्रींना केवळ आधारच दिला नाही, तर उपचार करून त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे.
एका घटनेने बदलले संपूर्ण आयुष्य
अमितच्या या ध्येयवेड्या प्रवासाची सुरुवात २००९ मधील एका हृदयद्रावक घटनेने झाली. रस्त्याच्या कडेला झाडाखाली अत्यंत दयनीय आणि अस्तिपंजर अवस्थेत पडलेल्या एका महिलेच्या अंगावर किडे पडले होते. अमितने तत्परतेने तिला कर्जत येथील डॉ. भरत वाटवाणी यांच्या ‘श्रद्धा पुनर्वसन केंद्रात’ दाखल केले. योग्य उपचारानंतर ती महिला बरी झाली आणि तिला उत्तर प्रदेशातील तिच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात आले. या घटनेने अमितच्या मनाला खोलवर स्पर्श केला आणि त्याने उर्वरित आयुष्य अशाच निराधार मनोयात्रींच्या सेवेसाठी वाहून घेण्याचा दृढनिश्चय केला.
९० हून अधिक जणांची घरवापसी
सुरुवातीला आजऱ्यात एका भाड्याच्या खोलीतून सुरू झालेल्या या सेवाकार्याचा विस्तार आता देशभरात झाला आहे. नेपाळसह उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम आणि लुधियाना यांसारख्या भागांतील ९० हून अधिक मनोयात्रींवर यशस्वी उपचार करून अमितने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
दगडफेक सोसली, पण माणुसकी सोडली नाही
आपले अनुभव सांगताना अमित म्हणाला, "रस्त्यावरील मनोरुग्णांना जवळ करणे सोपे नसते. कित्येकदा त्यांच्या अंगावर जखमा, आळ्या, वाढलेली नखे आणि मळकट जटा असतात. खाण्यापिण्याची शुद्ध नसते. स्वच्छ करायला किंवा औषध लावायला गेले की भीतीपोटी ते अंगावर दगड भिरकावतात. मात्र, अशा वेळी संयम न गमावता, प्रेमाने आणि खाणाखुणांनी त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो. बरे झाल्यानंतर अनेकदा ते जुनी ओळख विसरतात; पण एकदा एका बऱ्या झालेल्या महिलेने फोन करून 'तुम्ही मला माझे आयुष्य परत मिळवून दिले' असे सांगितले, तो क्षण माझ्या संपूर्ण कार्याची पावती देणारा ठरला."
नोकऱ्या सोडल्या, संकटे झेलली; पण ध्यास कायम
शिक्षक म्हणून काम केलेल्या अमितने या सेवाकार्यासाठी चांगल्या पगाराच्या ५ ते ६ नोकऱ्या सोडल्या. २०१४ मध्ये त्याला स्वतःचे घरही सोडावे लागले होते. मात्र, संकटांवर मात करत तो पुन्हा आपल्या मूळ गावी, पेरणोली येथे आई-वडिलांसोबत राहून कार्य करत आहे. कामाची व्याप्ती वाढल्याने त्याने 'माणुसकी फाउंडेशन' ची स्थापना केली आहे.
मित्रांच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या एका छोट्या रुग्णवाहिकेतून तो गरजूंपर्यंत पोहोचतो. या रुग्णवाहिकेत केवळ प्राथमिक औषधेच नव्हे, तर बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, चपलांचे जोड आणि महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सही सदैव उपलब्ध असतात.
'मनोयात्री निवारा प्रकल्प' लवकरच
सध्या अमित मनोरुग्णांच्या कायमस्वरूपी उपचार आणि निवाऱ्यासाठी 'मनोयात्री निवारा प्रकल्प' उभारणीच्या धडपडीत आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या आणि अंधारात चाचपडणाऱ्या मनोयात्रींच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करून अमित वसंत प्रभा हे आपले नाव खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आहेत.