आजरा - (विशेष प्रतिनिधी):
‘दिवाळीचा आनंद वाटूया… माणुसकीचा दीप उजळूया!’ या संकल्पनेतून संवेदना फाउंडेशनच्या साहित्य संवेदना विभागाच्या वतीने आयोजित ‘साहित्य संवेदना दिवाळी विशेषांक – २०२६’चा प्रकाशन सोहळा आणि दिवाळी आनंदोत्सव रविवारी उत्साहात पार पडला. मामणोली येथील समतोल फाउंडेशनच्या संकुलात झालेल्या या कार्यक्रमात साहित्य, समाजसेवा आणि माणुसकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संवेदना फाउंडेशनचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष पांडुरंग मोहिते, समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव तसेच सखी फाउंडेशनच्या मृणालिनी वानखेडे उपस्थित होते.
यावेळी सदानंद पुंडपाळ यांनी साहित्य संवेदना विभागाच्या विविध साहित्यिक उपक्रमांचा आढावा घेतला. संवेदना फाउंडेशनचे कार्याध्यक्ष पांडुरंग मोहिते यांनी संस्थेच्या नऊ विविध शाखांची माहिती देत सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा पट मांडला. समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव व सखी फाउंडेशनच्या मृणालिनी वानखेडे यांनी आपापल्या संस्थांच्या सामाजिक योगदानाविषयी विचार मांडले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘साहित्य संवेदना दिवाळी विशेषांक – २०२६’चे प्रकाशन संपन्न झाले.
बालमित्रांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य
दिवाळीचे औचित्य साधून उपस्थितांनी बालमित्रांसोबत आनंदोत्सव साजरा केला. संवेदना फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य, दिवाळी फराळ व विविध भेटवस्तू देण्यात आल्या. श्री. किसन वराडे यांच्या वतीने ब्लँकेट, श्री. समीर फनाडे यांच्या वतीने टी-शर्ट, तर सखी फाउंडेशनच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. महिला सदस्यांनी मुलांसोबत विविध खेळ खेळून त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
तीन सामाजिक संस्थांचे एकात्म दर्शन
संवेदना फाउंडेशन, समतोल फाउंडेशन आणि सखी फाउंडेशन या तीन स्वतंत्र संस्थांनी सामाजिक बांधिलकीच्या एकाच ध्येयाने एकत्र येत हा सोहळा यशस्वी केला, हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व दात्यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाने या उपक्रमाची सांगता झाली.