आजरा: प्रतिनिधी,
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेच्या सभासदांना १०% लाभांश (डिव्हिडंड) तसेच कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०२६ पासून रु. ३,००० ते रु. १०,००० पर्यंत भरघोस पगारवाढ आणि सन २०२५-२६ साठी २०% बोनस देण्याची घोषणा बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी केली आहे.
बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असून ३० सप्टेंबर २०२६ अखेर बँकेकडे ५०१.४१ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत, तर ३३३.२४ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. बँकेची नेत्रदीपक घोडदौड सुरू असून मार्च २०२७ अखेर ५५० कोटींच्या ठेवी व ३७५ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत बँकेकडे ७० हजार खातेदार असून सभासद संख्या ३५,०९९ इतकी आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ECBA (FSWM) निकषांची पूर्तता करत बँकेने ९०० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बँकेला देशातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सहाव्यांदा सन्मानित करण्यात आले आहे.
सणासुदीनिमित्त विविध कर्ज योजना
दसरा-दिवाळी सणानिमित्त बँकेने ग्राहकांसाठी आकर्षक कर्ज योजना जाहीर केल्या आहेत:
कार लोन: ९%
व्यावसायिक वाहन कर्ज: १०%
घरबांधणी कर्ज: ९%
सोनेतारण कर्ज: १०%
याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत बँकेने १,३७३ सभासदांना १५०.६० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेलाही भरीव कर्जपुरवठा केला आहे. जनरल मिटिंगमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार लाभांश आणि पगारवाढीची पूर्तता झाल्याने सभासद व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बँकेच्या या उत्तुंग यशात बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन अमित सामंत, ज्येष्ठ संचालक जयवंतराव शिंपी, महादेव टोपले, रणजीतदादा देसाई, विक्रम देसाई, शिवाजी पाटील व सर्व संचालक मंडळ, तसेच बँकेचे सीईओ एम. बी. पाटील, असिस्टंट मॅनेजर पी. ए. सरंबळे, अकाउंटंट एस. एच. चौगुले, वसुली अधिकारी एम. वाय. सावंत व सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.