प्रतिनिधी: आजरा,
येथील पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये 'महाहादगा' व नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थिनी व त्यांच्या माता-पालकांसाठी 'खेळ पैठणीचा मायलेकींची जोडी' या विशेष स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती आणि परंपरेचा जागर करणाऱ्या या उपक्रमात माता-पालक आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पाहुण्यांच्या स्वागतानंतर एस. आर. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. हा सोहळा माता-पालक आणि विद्यार्थिनींमधील नाते दृढ करणारा असून, पुढच्या पिढीला संस्कृतीची ओळख करून देणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर एस. पी. कांबळे यांनी हादग्याविषयी सविस्तर माहिती दिली. पाऊस, शेती आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा अधोरेखित करणारा हा सण का साजरा केला जातो, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे यांनी, "महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारी आपली संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शालेय स्तरावर अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन होणे काळाची गरज आहे," असे मत व्यक्त केले. सोहनी मॅडम यांनी हादग्याचा ऐतिहासिक संदर्भ सांगत विद्यार्थिनींना आपल्या संस्कृतीशी घट्ट नाळ जोडण्याचे आवाहन केले. माता-पालक प्रतिनिधी डॉ. स्मिता कुंभार यांनी, विद्यार्थिनी व माता-पालकांमधील संवाद आणि बंध अधिक दृढ करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे आभार मानले.
प्रास्ताविक व भाषणानंतर बहुप्रतिक्षित 'खेळ पैठणीचा मायलेकींची जोडी' ही स्पर्धा रंगली. विविध रंजक खेळांमध्ये माता-पालक व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आनंद लुटला. मंदार बापट यांनी आपल्या खुमासदार शैलीत या स्पर्धेचे प्रभावी निवेदन केले.
या स्पर्धेत सौ. वर्षा व कु. तनुजा निकम ही जोडी पैठणीची प्रथम मानकरी ठरली. सौ. तेजश्री व कु. दूर्वा बुरुड यांनी द्वितीय, तर सौ. शितल व कु. शुभ्रा कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या मायलेकींच्या जोड्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज व उपाध्यक्षा श्रीम. विमल भुसारी यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेनंतर विद्यार्थिनी, प्रमुख पाहुणे आणि मान्यवर महिलांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने हादग्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास संगीता पाटील, प्रिया नार्वेकर यांच्यासह मोठ्या संख्येने माता-पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन टी. बी. बुरुड यांनी केले, तर एस. ए. निर्मळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.