आजरा : प्रतिनिधी,
शासनाने आजरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला असल्याने तालुक्यातील बँका, पतसंस्था व फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती अथवा तगादा लावू नये, तसेच चालू आर्थिक वर्षाचे व्याज माफ करावे, या मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, चालू वर्षी तालुक्यामध्ये ‘अल-निनो’च्या प्रभावामुळे अत्यंत कमी पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके वाळून करपून गेली. उत्पादनात मोठी घट झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून त्याला घेतलेले कर्ज परतफेड करणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतही तालुक्यातील बँका, वित्तीय संस्था आणि पतसंस्था शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी सातत्याने तगादा लावत आहेत.
शासनाने आजरा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केलेला असल्याने प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा. बँका व फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर सक्ती न करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी चालू वर्षाचे व्याज माफ करण्यात यावे, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, शेतकरी सेना तालुका प्रमुख दिनेश कांबळे, शिवाजी आडाव, संजय सावंत (देऊळवाडी), सुयश पाटील यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.