चंदगड : प्रतिनिधी,
'भारत माता की जय...', 'वीर जवान अमर रहे...' या घोषणांनी दुमदुमलेले वातावरण, टाळ-मृदंगाचा गजर आणि अश्रूंनी भरलेले डोळे अशा अत्यंत हृदयस्पर्शी वातावरणात चंदगड तालुक्यातील बागिलगे येथील जवान मोहन परशराम गोविलकर यांच्यावर शनिवारी (दि. १७) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. मुलगा आदित्य याने वडिलांना भडाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा कंठ दाटून आला आणि अश्रू अनावर झाले.
मोहन गोविलकर हे आसाममधील बिजनी येथे सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) ५४ व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदावर कार्यरत होते. दि. १५ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांचे पार्थिव बागिलगे या मूळ गावी आणण्यात आले. पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.
अंतिम दर्शनानंतर गावातून भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली. संपूर्ण परिसर देशभक्तिपर घोषणांनी दुमदुमून गेला होता. ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. गावालगतच्या त्यांच्या शेतजमिनीत शासकीय इतमामात आणि मानवंदना देऊन अंत्यसंस्कार पार पडले.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, सभापती प्रा. विलास नाईक, राज्यकर आयुक्त गोपाळ पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, जे. बी. पाटील, माजी सैनिक संघटनेचे प्रतिनिधी आणि नातेवाईक यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
देशसेवेतील कर्तव्यनिष्ठ जवानाच्या निधनाने गोविलकर कुटुंबाचा मुख्य आधार हरपला असून, बागिलगे गावाने आपला अभिमान असलेला सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदानंद पाटील आणि गणपत पाटील यांनी केले.