वडकशिवाले:ता आजरा
वडकशिवाले (ता. आजरा )स्थानिक श्री कलेश्वर विद्या मंदिर वडकशिवाले आणि अंगणवाडी वडकशिवाले यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत ‘शाही दसरा महोत्सव २०२६’ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. परंपरेतून ज्ञान, संस्कृतीतून संस्कार आणि कृतीतून शिक्षण देण्याच्या उद्देशाने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील आणि अंगणवाडीतील विद्यार्थिनींनी नवदुर्गेचे नऊ दिव्य अवतार साकारून उपस्थितांची मने जिंकली. नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ वैशिष्ट्यपूर्ण रंग, त्या रंगांचे प्रतीक आणि नवदुर्गेच्या प्रत्येक रूपाचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व चिमुकल्या दुर्गांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी पद्धतीने मांडले.
रंगबिरंगी वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि प्रेरणादायी बनले होते. बालवयातच संस्कृती आणि मूल्यांची ओळख व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला.
"आमचे प्रयत्न हे केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरते नसून एक सुसंस्कृत आणि उत्कृष्ट पिढी घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत," अशी भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका, शाळेचे सर्व शिक्षकवृंद कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या अप्रतिम सादरीकरणाचे पालकवर्ग आणि ग्रामस्थांकडून सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.