घाटकरवाडी (विशेष प्रतिनिधी):
उन्हाची चाहूल लागताच जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटू लागतात, ज्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मुक्या प्राण्यांची हीच अडचण ओळखून सुळेरान पैकी घाटकरवाडी येथील बाळगोपाळांनी एकत्र येत एक अनोखा व कौतुकास्पद आदर्श घालून दिला आहे. परिसरातील डोंगरवाडी नजीक असलेल्या 'वाडीचा ओहळ' येथील पाणवट्यावर मुलांनी श्रमदानातून एक वनराई बंधारा उभारून वन्यजीवांची तहान भागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
उपलब्ध साहित्यातून साधली किमया
घाटकरवाडीतील पंकज पाटील, प्रभात पाटील, विशाल पाटील, सुजल पाटील, सोहम पाटील, विवेक पाटील आणि गंधर्व पाटील या शाळकरी मुलांनी एकत्र येऊन हे काम पूर्ण केले. झाडांच्या लहान फांद्या, दगड-गोटे, माती आणि सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांचा कल्पकतेने वापर करत मुलांनी वाहणारे पाणी अडवून छानसा बंधारा उभा केला.
वनक्षेत्रपालांचे लाभले मार्गदर्शन
चंदगडचे वनक्षेत्रपाल तथा मुलांचे काका श्री. दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी हा उपक्रम हाती घेतला. या बंधाऱ्यामुळे काही दिवसांसाठी का होईना, मुक्या प्राण्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे.
या वनक्षेत्रात गवे, सांबर, भेकर, रानडुक्कर, अस्वल, बिबट्या आणि हत्ती यांसारख्या वन्यजीवांचा मोठा वावर असतो. त्यामुळे जंगलातच पाणी उपलब्ध झाल्याने वन्यजीव गावाकडे किंवा मानवी वस्तीकडे वळण्याचा धोकाही काही प्रमाणात टळू शकेल.
भविष्यात आणखी बंधारे बांधण्याचा संकल्प
हा उपक्रम आकाराने जरी लहान वाटत असला, तरी 'जल, जंगल आणि जमीन' वाचवण्यासाठी या मुलांनी उचललेला हा वाटा अत्यंत मोलाचा ठरत आहे. भविष्यात गावातील इतर मुले आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन परिसरात आणखी वनराई बंधारे बांधण्याचा मानस या मुलांनी व्यक्त केला आहे. बालवयातच निसर्गाप्रती दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि समाजोपयोगी कार्याचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.