आजरा : प्रतिनिधी,
मतदार याद्यांचे संशयास्पद पुनर्निरीक्षण आणि कथित मतचोरीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना मदत करणाऱ्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या या तरुणाईला पाठिंबा दर्शवण्यासाठी आजऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १३ रोजी छत्रपती संभाजी चौकात भव्य निदर्शने करण्यात येणार आहेत.
देशभरात शांततेच्या व सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींवर पोलीस बळाचा गैरवापर करून त्यांना हिंसक पद्धतीने ताब्यात घेतले जात आहे. केंद्र व राज्य सरकारची ही दडपशाही लोकशाही मूल्यांचा गळा घोटणारी असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. "लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या निर्भीड तरुणाईच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी आहे," हा संदेश देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सरकारची ही दडपशाही मोडून काढण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय घटकांनी मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.