गडहिंग्लज: प्रतिनिधी,
गडहिंग्लज तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचा समावेश तातडीने दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा, या प्रमुख मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचा आज (दि. ३०) दुसरा दिवस होता. काल, २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
हे आंदोलन गडहिंग्लज तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीक विमा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणे अशा मागण्यांसाठी आंदोलक ठाम आहेत.
विविध घटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध संस्थांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये गडहिंग्लज तालुका बार असोसिएशनच्या वकिलांनी तसेच गडहिंग्लज नगरपरिषदेच्या आजी-माजी नगरसेवकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला. तसेच नूल गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभाग नोंदवला.
कसबा नूल ग्रामस्थांकडून अल्पोपहार
आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच कसबा नूल येथील ग्रामस्थांनी आज सर्व आंदोलकांसाठी अल्पोपहाराची चोख व्यवस्था केली. दुष्काळाच्या या लढ्यात सर्वसामान्य नागरिकही सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे या माध्यमातून दिसून आले.
शासनाने गडहिंग्लज तालुक्यातील गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तालुक्याला दुष्काळी जाहीर करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी दिला.