रामतीर्थ न्यूज ई-पेपर
देश

डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड' जाहीर

संपादक - गोपाळ गडकरी • 23 October 2026, 02:25 PM

आजरा : प्रतिनिधी,

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आजरा शाखेचे सेक्रेटरी डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय व समर्पित सेवा तसेच 'आयएमए' या मातृसंस्थेसाठी विविध स्तरांवर दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यस्तरीय 'आयएमए प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन ॲवॉर्ड २०२५-२६' जाहीर झाला आहे.

​हा पुरस्कार नागपूर येथील नॉर्थ अंबाझरी रोडवरील 'आयएमए हाऊस' येथे आयोजित राज्यस्तरीय 'मास्टाकॉन २०२६' (MASTACON 2026) परिषदेत प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता होणाऱ्या विशेष सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार दिला जाईल. याबाबतचे अधिकृत पत्र राज्य शाखेकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे.

​डॉ. अनिल देशपांडे यांनी केवळ वैद्यकीय सेवेतच नव्हे, तर आजरा परिसरातील सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले आहे. ते आजरा अर्बन बँकेचे माजी चेअरमन, आजरा शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन तसेच आजऱ्यातील नामांकित जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत राज्य पातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आजरा शहर, वैद्यकीय क्षेत्र आणि सहकार वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)