चंदगड: प्रतिनिधी,
चालू वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे परिसरातील ओढे-नाले वेगाने आटू लागले असून, पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी चंदगड सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मौजे भोगोली वनक्षेत्रातील काजीर्णे धनगरवाड्याजवळ वाहणाऱ्या ओढ्यावर श्रमदानातून नैसर्गिक वनराई बंधारा बांधण्यात आला.

काजीर्णे धनगरवाड्याजवळील या ओढ्यावरील पाण्याचा उपयोग नजीकच्या विहिरीद्वारे सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेसाठी केला जातो. तसेच जंगलातील वन्यप्राणी आणि नजीकच्या धनगरवाड्यातील पाळीव जनावरे मोठ्या प्रमाणावर येथे तहान भागवण्यासाठी येतात. मात्र, ओढ्यातील पाणी संपण्याच्या मार्गावर असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. ही समस्या ओळखून वन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत ओढ्यातील पालापाचोळा व गाळ काढून प्रवाह मोकळा केला.
त्यानंतर स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले दगड-धोंडे, माती, झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि प्लास्टिकच्या पोत्यांचा वापर करून मजबूत बंधारा उभारला. बंधाऱ्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग नियंत्रित होऊन ओढ्यातील छोट्या डोहामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे पाणीटंचाईच्या काळात वन्यप्राणी आणि गुराढोरांना हक्काचा पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे.
हा उपक्रम वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. वनपाल सलीम मुल्ला, माणिक खोत, वनरक्षक अरुण सांगळे, वनसेवक पांडुरंग खापरे, रवींद्र पाटील आणि श्रीकांत तराळ यांनी वनक्षेत्रपाल पाटील यांच्या समवेत स्वतः श्रमदान करून हा बंधारा पूर्णत्वास नेला.
"पाणीटंचाईवर मात करण्यासाठी येत्या काळातही अशाच पद्धतीने श्रमदानातून आणखी वनराई बंधारे बांधण्याचा विभागाचा मानस आहे. तसेच पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल."
— दत्ता पाटील, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण चंदगड
लोकसहभागातून मिरवेल येथे पाणलोट बंधाऱ्याची उभारणी; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
मिरवेल (विशेष प्रतिनिधी):
ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल, पारगड आणि नामखोल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त श्रमदानातून दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मिरवेल येथे पाणलोट बंधारा उभारण्यात आला. आगामी उन्हाळ्यात जाणवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी अडवणे आणि भूजल पातळी वाढवणे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या श्रमदान उपक्रमामध्ये ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे, सदस्या दीपाली पवार आणि शिपाई संजय कांबळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामात सहभाग घेतला व ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.
पाणलोट बंधारा उभारणीत गावातील महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. यामध्ये शोभा पवार, ऋणाली पवार, भागीरथी गवस, सरस्वती पवार तसेच अंगणवाडी मदतनीस जिजाबाई बाणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवत बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.
शासकीय योजनांची वाट न पाहता लोकसहभाग आणि एकजुटीच्या जोरावर गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी उचललेले हे पाऊल परिसरात कौतुकास्पद ठरत आहे. बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी अडण्यास मदत होणार असून परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होईल, असा विश्वास सरपंच तुकाराम सुतार यांनी यावेळी व्यक्त केला.