रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

६ वर्षांचा अंधार संपला! आजरा–गांधीनगर रस्त्यावरील मंजीरीतील पथदिवे अखेर लखलखले

संपादक - गोपाळ गडकरी • 27 October 2026, 08:32 PM

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा–गांधीनगर रस्त्यावरील मंजीरी परिसरातील पथदिव्यांचा गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या मार्गावर नव्याने बसविण्यात आलेल्या पथदिव्यांची चाचणी यशस्वी झाली असून, रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​सहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करताना जुने पथदिवे हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर नवीन दिवे न बसवल्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना वर्षानुवर्षे अंधारातूनच धोकादायक प्रवास करावा लागत होता. प्रभाग क्र. १५ चे नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी प्रशासकीय कारभारापासून ते लोकनियुक्त मंडळ येईपर्यंत या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. निधी उपलब्ध झाल्यानंतर अखेर हे काम पूर्ण झाले.

​या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल नगरसेवक बामणे यांनी नगराध्यक्ष अशोक अण्णा, मुख्याधिकारी श्री. सुर्वे, नगरपंचायत अधिकारी सौ. मानसी कदम, किरण कांबळे, नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

​या दिव्यांमुळे समर्थ कॉलनी, रवळनाथ कॉलनी, शिव कॉलनी, आयडियल कॉलनी, आनंदवन कॉलनी, गांधीनगर तसेच ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रभागातील ज्या गल्ल्यांमध्ये गेल्या १५-२० वर्षांपासून पथदिवे पोहोचलेले नाहीत, तिथेही मंजुरी मिळवून लवकरच उजेड पोहोचवला जाईल, असा विश्वास नगरसेवक बामणे यांनी व्यक्त केला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)