रामतीर्थ न्यूज ई-पेपर
शैक्षणिक

वेल्डिंगच्या ठिणग्यांतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिल्पकार विजयकुमार मंगल सर

संपादक - गोपाळ गडकरी • 01 November 2026, 09:57 PM

आजरा : प्रतिनिधी

“लोखंडाला आकार देणारे हात जेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात, तेव्हा केवळ कुशल कारागीर नव्हे, तर उद्याचा समर्थ समाज घडत असतो,” याचा वस्तुपाठ आपल्या प्रदीर्घ तीस वर्षांच्या सेवेतून घालून देणारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) ज्येष्ठ व लाडके शिल्पनिदेशक श्री. विजयकुमार राजाराम मंगल सर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि आदर्श ज्ञानदानाच्या प्रवासाची सांगता झाल्याने शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

​मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील रहिवासी असलेल्या मंगल सरांनी आयटीआयमधून वेल्डर व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या जीवनाला कौशल्य शिक्षणाचा पाया दिला. केवळ स्वतः कुशल कारागीर न बनता समाजातील शेकडो होतकरू, ग्रामीण व कष्टकरी विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा वसा त्यांनी स्वीकारला. ११ नोव्हेंबर १९९६ रोजी शासकीय सेवेत रुजू होऊन त्यांनी आपल्या अखंड ज्ञानयज्ञाची सुरुवात केली.

​आजऱ्यात प्रदीर्घ सेवा व कौशल्याची शिदोरी

आपल्या सेवाप्रवासात मंगल सरांनी १९९६ ते २००७ या काळात सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे, तर २०१४ ते २०२१ या काळात सांगली येथे सेवा बजावली. आजरा आयटीआय येथे २००७ ते २०१४ आणि २०२१ ते सेवानिवृत्तीपर्यंत अशा दोन टप्प्यांत मिळून त्यांनी सुमारे १३ वर्षे आजरा परिसरातील दुर्गम व ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्यसंपन्न बनवण्यासाठी समर्पित केली. कार्यक्षेत्रे बदलली तरी त्यांची शिकवण्याची तळमळ आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी तसूभरही ढळली नाही.

​धातू जोडताना दिली जीवनाला दिशा

वेल्डिंगसारख्या अचूकता, एकाग्रता, संयम व सुरक्षिततेची गरज असणाऱ्या व्यवसायाचे शिक्षण देताना मंगल सरांनी केवळ यंत्रे हाताळायला शिकवली नाहीत; तर विद्यार्थ्यांमध्ये वेळेचे भान, जबाबदारीची जाणीव आणि गुणवत्तेची सवय रुजवली. दोन धातू एकजीव करण्याचे तंत्र शिकवत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्याशी जोडण्याचे मोलाचे कार्य केले. आज त्यांचे शेकडो विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असून अनेकांनी स्वतःचे यशस्वी उद्योग-व्यवसाय उभारून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले आहे.

​शांत, संयमी व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व

ज्ञानाचा अहंकार नाही, पदाचा बडेजाव नाही; अत्यंत साधी राहणी, शांत, संयमी व मितभाषी स्वभाव ही मंगल सरांची खरी ओळख राहिली. विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य दिशा देणारा हा मार्गदर्शक म्हणून संस्थेत सुपरिचित राहिला. नोकरीतील कर्तव्यनिष्ठेसोबतच त्यांनी आदर्श कुटुंबवत्सलता आणि सामाजिक बांधिलकीचे भानही तितकेच निष्ठेने जपले.

​त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेची सांगता झाल्यानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी व आजी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या कार्याचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. निवृत्तीनंतरचे त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे, आरोग्यसंपन्न आणि मंगलमय जावो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

शब्दांकन - दावणेसर

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)