रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्रा. रमेश चव्हाण

संपादक - गोपाळ गडकरी • 15 October 2026, 01:10 PM

आजरा, दि. १५ (प्रतिनिधी):

"वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व विकासाची खरी गुरुकिल्ली आहे," असे परखड प्रतिपादन प्रा. रमेश चव्हाण यांनी येथे केले. आजरा महाविद्यालय, आजरा येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'वाचन प्रेरणा दिन' कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार होते.

​महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, विद्यार्थी विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

​विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगताना प्रा. चव्हाण पुढे म्हणाले, "आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे तरुणांमधील वाचनाची सवय लोप पावत चालली आहे, ही चिंताजनक बाब आहे. विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ नियमित वाचनासाठी आवर्जून दिला पाहिजे. पुस्तके माणसाला विचार करायला शिकवतात, कल्पनाशक्ती समृद्ध करतात आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन देतात. दर्जेदार साहित्याच्या वाचनातून संवेदनशीलता, विवेक आणि सामाजिक भान विकसित होते."

​अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, सातत्याने ज्ञानाची साधना करावी आणि वाचनाच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा द्यावी. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपलीकडे जाऊन चरित्रे, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, कविता व वैचारिक साहित्याचे नियमित वाचन करावे."

​कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या निमित्ताने ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तकांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. अविनाश वर्धन यांच्यासह प्रा. विनायक चव्हाण, डॉ. आप्पासो बुडके आणि प्रा. रत्नदीप पोवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)