रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

वाचनाच्या बळावर जग जिंकण्याची क्षमता निर्माण होते : प्रा. मनोजकुमार पाटील

संपादक - गोपाळ गडकरी • 15 October 2026, 06:22 PM

आजरा (विशेष प्रतिनिधी):

"वाचनाच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर माणसामध्ये जग जिंकण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. वाचन हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून विचारांना दिशा देणारे आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे प्रभावी माध्यम आहे," असे प्रतिपादन प्राध्यापक मनोजकुमार पाटील यांनी केले.

​येथील आजरा महाविद्यालय, आजराच्या व्होकेशनल विभागाच्या वतीने 'वाचन प्रेरणादिन' उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून आपली विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी केले.

​याप्रसंगी व्होकेशनल विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध वाचन उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये, आकलनशक्ती आणि वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होते, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

​कार्यक्रमास प्रा. नेहा पेडणेकर, प्रा. सुषमा पारकर, प्रा. तेजस्विनी जाधव, प्रा. नार्वेकर मॅडम आणि प्रा. गिरीश कुरुणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

​कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्राध्यापक संदीप देसाई यांनी केले. 'वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार आणि विचारातून प्रगती' हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)