रामतीर्थ न्यूज ई-पेपर
शैक्षणिक

उपदेश नव्हे, कृतीतून श्रमप्रतिष्ठेचा संस्कार!

संपादक - गोपाळ गडकरी • 31 October 2026, 12:10 PM

चंदगड (प्रतिनिधी) :

विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वच्छतेची सवय आणि प्रत्यक्ष कामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने येथील ‘दि. न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत कृतियुक्त श्रमप्रतिष्ठा मूल्यसंस्कार मोहीम उत्साहात राबविण्यात आली. केवळ भाषणांतून किंवा उपदेशातून न सांगता स्वतः कृती करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला.

​या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत संपूर्ण शालेय परिसराची सखोल स्वच्छता केली. कचरा संकलन, वर्गखोल्यांची व बागेची नीटनेटकेपणाने आवराआवर करत संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवला. विशेष म्हणजे, विद्यालयाचे उपप्राचार्य टी. एस. चांदेकर व पर्यवेक्षक एस. एल. बेळगावकर यांनी स्वतः हातात फावडे घेऊन श्रमदानाला सुरुवात केली. प्रशासकीय प्रमुखांनीच प्रत्यक्ष कामात पुढाकार घेतल्याने सर्व उपस्थितांमध्ये मोठा उत्साह संचारला.

​या श्रमदान मोहिमेत क्रीडाशिक्षक टी. व्ही. खंदाळे, ग्रंथपाल शरद हदगल, सांस्कृतिक विभागप्रमुख संजय साबळे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच विद्यालयाचे चतुर्थश्रेणी कर्मचारी सागर कुंभार, अविनाश पाटील व अमित कुट्रे यांनीही विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.

​"कष्ट हेच खरे भांडवल" — उपप्राचार्य टी. एस. चांदेकर

याप्रसंगी बोलताना उपप्राचार्य टी. एस. चांदेकर म्हणाले, "कष्ट हेच माणसाचे खरे भांडवल आहे. भावी पिढीने श्रमाचे खरे मूल्य जाणून घेतले पाहिजे. कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते, ही स्वाभिमानाची व समतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी यासाठी शिक्षकांनी स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करणे गरजेचे होते. त्या उद्देशातूनच हा कृतियुक्त उपक्रम आम्ही हाती घेतला."

​केवळ तोंडी उपदेश न देता स्वतः प्रत्यक्ष राबून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांवर श्रमसंस्कार रुजविणाऱ्या या उपक्रमाचे चंदगड व परिसरातील पालक वर्गातून, शिक्षणप्रेमींतून मोठे कौतुक होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)