रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

दुष्काळसदृश परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा आधार; हरपवडे जंगलात वनराई बंधारा पूर्ण

संपादक - गोपाळ गडकरी • 21 October 2026, 06:54 PM

आजरा (विशेष प्रतिनिधी):

वाढत्या उन्हाळ्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीवांची होणारी भटकंती रोखण्याच्या उद्देशाने वनपरिक्षेत्र आजरा (प्रा.), वनपरिमंडळ उत्तर आजरा व नियतक्षेत्र साळगाव अंतर्गत हरपवडे येथील जंगल कक्ष क्रमांक १६३ A मध्ये नुकताच वनराई बंधारा उभारण्यात आला.

​उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढते. ही बाब ओळखून जंगलातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याचा कायमस्वरूपी आधार निर्माण व्हावा, या हेतूने ही उपाययोजना करण्यात आली आहे.

​हा उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सचिन सावंत आणि उत्तर आजराचे वनपाल श्री. कृष्णा डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.

​बंधारा उभारणीच्या कामात साळगावच्या वनरक्षक श्रीमती सरिता बावस्कर, वनमजूर सर्वश्री कुंडलिक शिंदे, मधुकर दोरुगडे, वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य समीर केरकर, अक्षय पाटील, सौरभ कोंडूस्कर, प्रवीण कांबळे तसेच हरपवडे धनगरवाडा येथील ग्रामस्थ विशाल गावडे व दादू येडगे यांनी विशेष सहकार्य व श्रमदान केले.

​"वन्यप्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध करून देणे, हे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. वन्यजीवांचे अस्तित्व सुरक्षित राखण्यासाठी अशा जलसंधारण व निसर्ग संवर्धन उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळणे गरजेचे आहे."

— वनविभाग, आजरा

​या उपक्रमामुळे परिसरातील विविध वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार असून, वनविभाग व ग्रामस्थांच्या या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)