रामतीर्थ न्यूज ई-पेपर
आरोग्य

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

संपादक - गोपाळ गडकरी • 07 November 2026, 09:37 PM

आजरा - (विशेष प्रतिनिधी):

आरोग्य विभागाच्या विविध विकासकामांमुळे राधानगरीचा चेहरामोहरा बदलत असून, भविष्यात राधानगरीला 'मेडिकल व टुरिझम हब' म्हणून विकसित करण्यात येईल, असा ठाम विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक '२ डी इको कार्डिओग्राफी' सेवेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. हृदयविकाराच्या अचूक निदानासाठी आवश्यक असलेली २ डी इको सेवा आता राधानगरीतच उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. या रुग्णालयामध्ये १०० खाटांची क्षमता वाढवण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी निधी दिला आहे. राधानगरीत 'आयुष वेलनेस सेंटर', गारगोटीत अद्ययावत नेत्रालय आणि कोल्हापूर जिल्ह्यात राज्यातील पहिले 'कॅशलेस हॉस्पिटल' लवकरच सुरू केले जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

​पर्यटनाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, दाजीपूर अभयारण्यात वाघाचे दर्शन होणे हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. पर्यटकांना उत्तम पायाभूत सुविधा पुरवून राधानगरीला राज्याच्या पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळवून दिली जाईल. आरोग्य यंत्रणेतील अडचणी जाणून घेण्यासाठी राबवली जाणारी 'आरोग्य संवाद यात्रा' आरोग्य खात्याच्या कामकाजातील मैलाचा दगड ठरेल, असेही ते म्हणाले.

​याप्रसंगी बोलताना ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक कार्डिओलॉजिस्ट डॉ. चरित भोजराज यांनी राज्यभरात अत्याधुनिक सेवा पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष दीपक शेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव व पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आरोग्य सेवा घराघरात पोहोचवली जात असून या नव्या सुविधेचा तालुक्याला मोठा फायदा होईल.

​या कार्यक्रमास राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप माने, कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉ. हेमलता पालेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. डी. देशमुख, राधानगरी पंचायत समिती उपसभापती अश्विनी चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी मानले.

आजरा बाजार पेठेत दिपावाली निमित्य खरेदी साठी हौस फुल्ल गर्दि

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)