रामतीर्थ न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक उत्साहात व प्रार्थनामय वातावरणात संपन्न

संपादक - गोपाळ गडकरी • 25 October 2026, 10:49 PM

आजरा (प्रतिनिधी):

स्थानिक रोजरी चर्च व संपूर्ण आजरा धर्मग्रामामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण ऑक्टोबर महिना 'रोजरी मातेच्या प्रार्थनेचा महिना' म्हणून अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. या प्रार्थना महिन्याची सांगता आज रविवार, २५ ऑक्टोबर रोजी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य व शिस्तबद्ध मिरवणुकीने करण्यात आली.

​या सांगता सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग धर्मप्रांताचे नूतन महागुरू स्वामी वंदनीय आग्नेलो पिन्हेरो यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. चाफे गल्ली येथे त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी रोजरी शाळेच्या विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने अप्रतिम प्रात्यक्षिके सादर केली, तर एमसीसी (MCC) च्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन व कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना पार पडली.

​कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात आकर्षक फुलांनी सजवलेल्या जीपमधून मारिया मातेच्या मूर्तीची आजरा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान मुलींनी भक्तीपूर्ण प्रार्थना नृत्य सादर केले. मिरवणुकीत फादर विल्यम डिसोझा यांनी बायबलमधील पवित्र वचनांच्या आधारे शुभवर्तमानाचे प्रकटन केले तसेच संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी व जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना केली. तर इनास फर्नांडिस यांनी उपस्थित भाविकांसाठी मध्यस्थी प्रार्थना केली.

​या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आजरा धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर मेल्विन, सहाय्यक धर्मगुरू फादर वॉल्विन, ब्रदर जीतन यांच्यासह 'पॅरिश पास्टरल कौन्सिल'च्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

​या सांगता सोहळ्यास व मिरवणुकीस वाटंगी, गवसे, धनगरमोळा, खानापूर, पेरणोली, साळगाव, हालेवाडी, दाभील, शेळप आणि खेडगे आदी गावांतील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अल्बर्ट सर यांच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)