रामतीर्थ न्यूज ई-पेपर
क्रीडा

‘कै. बाबुरावजी कुंभार स्मृती चषका’वर शृंगारवाडी वॉरियर्सचा कब्जा!

संपादक - गोपाळ गडकरी • 31 October 2026, 08:53 PM

आजरा : प्रतिनिधी,

आजरा तालुक्याचे ज्येष्ठ लोकनेते, भाजपचे निष्ठावंत नेते कै. बाबुरावजी कुंभार यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त ‘कै. बाबुरावजी कुंभार विचार मंच’च्या वतीने आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेत ‘शृंगारवाडी वॉरियर्स’ संघाने अंतिम सामन्यात बाजी मारत मानाच्या ‘कै. बाबुरावजी कुंभार स्मृती चषका’वर आपले नाव कोरले. गुरुवार, दि. २९ व शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी पंडित दीनदयाळ विद्यालयाच्या मैदानावर विद्युत झोतात पार पडलेल्या या स्पर्धेने आजऱ्यातील क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

​दिमाखदार उद्घाटन सोहळा

स्पर्धेचे उद्घाटन आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तथा जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकअण्णा चराटी, मुकुंददादा देसाई, जयवंतराव शिंपी, सुधीर देसाई, दयानंद भुसारी, सुधीर मुंज तसेच नगरपंचायतीच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

​मैदानावर चुरस आणि खेळाचा थरार

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित अशा १६ मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक सामन्यात पकड आणि चढायांचा थरारक खेळ पाहायला मिळाला. उपांत्य आणि अंतिम फेरीत खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्याने संपूर्ण मैदान दणाणून सोडले होते. अंतिम सामन्यात शृंगारवाडी वॉरियर्सने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदाला गवसणी घातली.

​प्रथम क्रमांक (विजेता) : शृंगारवाडी वॉरियर्स

​द्वितीय क्रमांक (उपविजेता) : शिवमुद्रा, कवलव

​तृतीय क्रमांक : मडिलगे संघ

​चतुर्थ क्रमांक : नवभारत, शिरोली

​वैयक्तिक व विशेष पुरस्कार :

​सर्वोत्कृष्ट खेळाडू (Player of the Tournament) : निखिल बर्गे

​उत्कृष्ट चढाई (Best Raider) : अभिषेक गुंगे

​उत्कृष्ट पकड (Best Defender) : राजवर्धन लोंढे

​आदर्श संघ (Fair Play Award) : रवळनाथ, कडलगे

​भव्य बक्षीस वितरण

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भैय्यासाहेब आबिटकर, सौ. भारतीताई जाधव, श्रीमती सोनाबाई बाबुरावजी कुंभार यांच्यासह राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके व भव्य चषक प्रदान करून गौरविण्यात आले.

​नेटक्या नियोजनाची छाप

ग्रामीण भागातील होतकरू कबड्डीपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि क्रीडा संस्कृती जोपासली जावी, या उदात्त हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुधीर कुंभार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार यांच्या अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध नियोजनामुळे ही स्पर्धा जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

​स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिवाजी बोलके, शिवाजी पारले, प्रकाश प्रभू, धनाजी पारपोलकर आणि प्रदीप पाचवडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे रसाळ व प्रभावी समालोचन अनिल कांबळे यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने आजरा परिसरातील क्रीडारसिकांना एक अविस्मरणीय पर्वणी दिली.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)