आजरा : प्रतिनिधी,
येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या 'CBS बँकिंग' (Core Banking Solution) या आधुनिक कार्यप्रणालीबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविकातून प्रशिक्षण शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. आधुनिक बँकेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.
या प्रशिक्षण शिबिरात 'कॉम्पसॉफ्ट' संगणक प्रशिक्षण संस्थेचे डायरेक्टर सुदाम पाटील तसेच त्यांचे सहकारी वसिम मनगोळे यांनी उपस्थितांना CBS कार्यप्रणालीविषयी सखोल आणि उत्तम मार्गदर्शन केले. CBS प्रणालीचा दैनंदिन बँकिंग कामकाजात कसा प्रभावीपणे वापर करावा, याविषयीचे प्रात्यक्षिक व तंत्रज्ञानाशी निगडित विविध पैलू त्यांनी सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे आभार संस्थेचे मॅनेजर मधुकर खवरे यांनी मानले. या शिबिरास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार यांच्यासह सर्व शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण शिबिर उत्साही व माहितीपूर्ण वातावरणात पार पडले.
जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना दोन पगार, ड्रेस कोड व फराळाची दिवाळी भेट
जनता सहकारी गृहतारण संस्थेकडे आज १३५ कोटींपेक्षा अधिक ठेवी असून सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता राहिला आहे. कर्मचाऱ्यांचे हे योगदान मोलाचे असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १६.६६ टक्के म्हणजेच दोन पगार, ड्रेस कोड, दिवाळी फराळ आणि साहित्य भेट म्हणून देताना विशेष समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन चेअरमन मारुती मोरे यांनी केले.
अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या संस्थेने ठेवी आणि कर्जाचे योग्य प्रमाण राखत अनेकांची घरांची स्वप्ने पूर्ण केली आहेत; संस्था नावारूपाला आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भविष्यात आपल्या संपूर्ण क्षमतांचा वापर करावा, असे आवाहन व्हाइस चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर यांनी केले.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दोन महिन्यांचा पगार, दोन ड्रेसकोड, भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संचालक रवींद्र आजगेकर, प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार व शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते.
आभार मानताना मॅनेजर मधुकर खवरे यांनी सांगितले की, संचालक मंडळाने नेहमीच कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेतले असून त्यांनी दिलेली भेट आनंदाने स्वीकारून संस्थेच्या प्रगतीसाठी एकदिलाने काम करू.