रामतीर्थ न्यूज ई-पेपर
अर्थव्यवस्था

जनता गृहतारणच्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ. अध्यक्ष श्री. मारुती मोरे

संपादक - गोपाळ गडकरी • 04 November 2026, 06:53 PM

आजरा / प्रतिनिधी :

जनता गृहतारण संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळेच संस्थेने ऑक्टोबर २०२६ अखेर १३५ कोटी रुपयांच्या ठेवी संकलनाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या वेतनात दरमहा १२ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भरघोस वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी दिली. या विशेष निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे पगार थेट दुप्पट झाले आहेत.

​संस्थेमार्फत दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नियमित वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र, यंदा कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा आणि घेतलेल्या कष्टांचा गौरव म्हणून संचालक मंडळाने ही विशेष वेतनवाढ मंजूर केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक बळ वाढेल, त्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांच्यात कामाची नवी ऊर्जा निर्माण होऊन संस्थेच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केला.

​याप्रसंगी आभार व्यक्त करताना संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचुळकर म्हणाले की, संस्थेमार्फत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन दिले जाते. याशिवाय ग्रॅच्युइटी, दिवाळी बोनस, कर्मचारी विमा, दैनिक भत्ता आणि घरभाडे भत्ता अशा विविध कल्याणकारी सुविधा नियमितपणे पुरविल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या हिताला सदैव प्राधान्य देण्याची संस्थेची परंपरा असून, ही विशेष वेतनवाढ त्याचाच एक भाग आहे.

​या कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्रा. रवींद्र आजगेकर, इंजि. प्रदीप मोरे, कृष्णा डेळेकर, युवराज शेटके, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी सौरभ नांदवडेकर यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)