रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

गोकुळ दूध संघ निवडणुकीत ९९.९६% विक्रमी मतदान; उद्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!

संपादक - गोपाळ गडकरी • 18 October 2026, 07:30 PM

कोल्हापूर: प्रतिनिधी,

कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी तब्बल ९९.९६ टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण ५,४१८ पात्र मतदारांपैकी ५,४१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून केवळ दोन मतदारांनी मतदान केले नाही. या ऐतिहासिक मतदानानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सोमवारी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.

​१० तालुक्यांत १०० टक्के मतदान

जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये ३५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उपलब्ध माहितीनुसार, १२ पैकी तब्बल १० तालुक्यांत १०० टक्के मतदान नोंदवले गेले आहे. मतदानासाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला, तर कागल, करवीरसह विविध तालुक्यांत दोन्ही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.

​नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; २५ जागांसाठी ५० उमेदवार

गोकुळच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी एकूण ५० उमेदवार नशिब आजमावत आहेत. ही निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारे आघाडी' आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित 'महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' यांच्यात अत्यंत चुरशीची झाली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने या निवडणुकीकडे केवळ सहकार क्षेत्रातील सत्तासंघर्ष म्हणून न पाहता जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिले जात आहे.

​रमनमळा येथे उद्या मतमोजणी

गोकुळ निवडणुकीची मतमोजणी सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून ३२ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निकालातून गोकुळच्या पुढील पाच वर्षांच्या कारभाराची दिशा ठरणार असल्याने दुग्ध उत्पादक, संस्थांचे प्रतिनिधी आणि राजकीय वर्तुळाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)