रामतीर्थ न्यूज ई-पेपर
महाराष्ट्र

गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत तातडीने समावेश करा; मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील यांची महसूलमंत्र्यांकडे आग्रही मागणी

संपादक - गोपाळ गडकरी • 03 November 2026, 04:35 PM

गडहिंग्लज: प्रतिनिधी,

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी आग्रही मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मुंबईत महसूलमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील लेखी निवेदन सादर करण्यात आले.

​शासनाने नुकताच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत नव्याने समावेश केला; मात्र तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्याला वगळण्यात आले. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याची भीषण टंचाई आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले.

​तालुक्याला दुष्काळी सवलती मिळाव्यात यासाठी दसरा चौक, गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शेतकरी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजल्या, बैलजोड्या बांधल्या, तसेच शहरातून लक्षवेधी घोडागाडी रॅली, विद्यार्थी फेरी आणि आठवडा बाजारात ‘भीक मागो’ आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या जनआक्रोशाची तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

​निवेदनातील प्रमुख मागण्या:

​गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या अधिकृत यादीत तत्काळ समावेश करावा.

​तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करण्याचे आदेश द्यावेत.

​टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या आणि रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत.

​बाधित शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी आणि थेट आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)