चंदगड (प्रतिनिधी):
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वर्गखोलीत नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून आनंददायी शिक्षणाचा पाया रचणारे 'दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड' येथील उपक्रमशील शिक्षक श्री. संजय गोपाळ साबळे यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल शिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर करण्यात आला.
श्री. साबळे हे केवळ एक आदर्श शिक्षक नसून मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि मराठी अध्यापक संघ, कोल्हापूर जिल्ह्याचे सक्रिय सदस्य म्हणूनही परिचित आहेत. अध्यापनाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे, वर्गात उत्साहपूर्ण वातावरण तयार करणे आणि मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे ही त्यांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत. शिक्षण ही केवळ गुणांची शर्यत नसून जगणे समृद्ध करणारी प्रक्रिया आहे, या विचाराने त्यांनी सातत्याने विद्यार्थी-केंद्री उपक्रम राबविले आहेत.
केवळ शालेय अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडली आहे. एक प्रभावी वक्ते, उत्कृष्ट निवेदक, गायक आणि संगीतकार म्हणून त्यांची ख्याती असून, शब्द आणि सुरांच्या माध्यमातून त्यांनी नव्या पिढीमध्ये मराठी भाषा व साहित्याची आवड निर्माण केली आहे.
आजच्या तंत्रज्ञानाधारित आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील आणि विचारक्षम बनवण्याचे मोलाचे कार्य संजय साबळे यांच्यासारखे शिक्षक करत आहेत. त्यांच्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.