रामतीर्थ न्यूज ई-पेपर
सामाजिक

ऐतिहासिक किल्ले पारगडावर उद्या दीपोत्सव व मशाल महोत्सव.

संपादक - गोपाळ गडकरी • 08 November 2026, 08:41 PM

चंदगड : प्रतिनिधी,

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर करण्यासाठी ऐतिहासिक किल्ले पारगड येथे उद्या, सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी भव्य दीपोत्सव व मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुराष्ट्र सेना आणि श्रीराम सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सलग नवव्या वर्षी हा दीपोत्सव संपन्न होत आहे.

​या उपक्रमाची सुरुवात उद्या सकाळी ९ वाजता होणार असून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत किल्ले पारगडावर व्यापक दुर्गस्वच्छता मोहीम राबवली जाईल. सायंकाळी पारगडावर दीपोत्सव आणि मशाल प्रज्वलन सोहळा पार पडेल. या सायंकाळच्या प्रमुख कार्यक्रमाला श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक तसेच कर्नाटक राज्याध्यक्ष रवीकुमार कोकितकर उपस्थित राहणार आहेत.

​ऐतिहासिक वारशाचे जतन, दुर्गसंवर्धन आणि शिवशंभूंच्या विचारांचा प्रसार करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीने किमान पाच दिवे, शिवज्योत व मशाल सोबत आणावी, असे आवाहन श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष महांतेश देसाई व तालुकाध्यक्ष तुकाराम मरगाळे यांनी केले आहे. या सोहळ्यास परिसरातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, युवक आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)