रामतीर्थ न्यूज ई-पेपर
सामाजिक

आजरा रवळनाथ कॉलनी येथे ‘वाय. बी. एस.टी. स्टॉप’

संपादक - गोपाळ गडकरी • 08 November 2026, 11:29 AM

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा शहरातील वॉर्ड क्रमांक १५ मधील रवळनाथ कॉलनी परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकृत ‘वाय. बी. एस.टी. स्टॉप’ मंजूर करून घेण्यात आला असून प्रत्यक्ष थांबा सुरू करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक श्री. परशुराम बामणे (भाऊजी) व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून हा थांबा मंजूर झाला असून, या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी दोन बाकडी आणि अधिकृत बस थांबा फलक (बोर्ड) बसवण्यात आला आहे.

​राईस मिल ते सरकारी दवाखाना या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना बस पकडण्यासाठी थेट राईस मिलपर्यंत पायपीट करावी लागत होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक परशुराम बामणे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा थांबा अधिकृतरीत्या मंजूर करून घेतला.

​प्रवाशांच्या बसण्याच्या सुविधेसाठी एक बाकडे नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांनी स्वतः दिले, तर दुसरे बाकडे श्री. पांडुरंग सावरकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. या नवीन थांब्यामुळे गांधीनगर, सरकारी रुग्णालय परिसर, आवंडी नगर, रायवाडा, खानापूर, विटे, पोळगांव, एरंडोळ, लाटगांव या मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या कार्यात नगरसेवक परशुराम बामणे (भाऊजी) यांच्यासह दिनकर जाधव, रामचंद्र पंडित, अगस्तीन नोरेंज, मदन तानावडे, अतुल पाटील, बाळू कांबळे आदींचे विशेष सहकार्य लाभले. प्राथमिक सुविधांनंतर प्रवाशांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून लवकरच या ठिकाणी प्रशस्त निवारा शेडचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याचे नगरसेवक श्री. बामणे यांनी सांगितले. या लोकहितोपयोगी कार्याबद्दल स्थानिक नागरिक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)