रामतीर्थ न्यूज ई-पेपर
सामाजिक

आजरा–महागाव मार्गावर सकाळच्या फेरफटक्यासाठी ‘श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स’कडून सिमेंट बाकडी (बेंच) उपलब्ध

संपादक - गोपाळ गडकरी • 06 November 2026, 07:54 AM

आजरा (प्रतिनिधी):

सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर असणाऱ्या ‘श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट), गडहिंग्लज’च्या आजरा शाखेमार्फत आजरा–महागाव रस्त्यावर नागरिकांच्या सोयीसाठी विश्रांती बेंच (बाकडी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संस्थेच्या या तत्पर व संवेदनशील निर्णयामुळे सकाळी फेरफटक्यासाठी (मॉर्निंग वॉक) जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे.

​नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद

​आजरा ते महागाव मुख्य मार्गावर दररोज सकाळी आणि सायंकाळी नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने फिरण्यासाठी जातात. मात्र, चालताना दम लागल्यास किंवा विश्रांती घेण्यासाठी या मार्गावर कुठेही बसण्याची सोय नव्हती. ही गैरसोय लक्षात घेऊन स्थानिक नागरिक व ज्येष्ठांनी रवळनाथ हौसिंग फायनान्स संस्थेकडे बाकडी बसवण्याची विनंती केली होती.

​नागरिकांच्या या मागणीची दखल घेत संस्थेने अत्यंत तत्परतेने या फिरण्याच्या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी मजबूत सिमेंट बाकडी उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे थकवा आल्यावर क्षणभर विसावा घेण्यासाठी ज्येष्ठांची होणारी गैरसोय पूर्णपणे दूर झाली असून याचा लाभ नियमित फेरफटका मारणाऱ्या नागरिकांना होत आहे.

​संस्था व व्यवस्थापनाचे आभार

​केवळ आर्थिक सेवांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अडचणी समजून सामाजिक जाणीव जपल्याबद्दल सकाळी फेरफटक्यासाठी जाणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थांच्या वतीने श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सचे मा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ आणि आजरा शाखेचा कर्मचारी वर्ग यांचे जाहीर आभार मानण्यात आले. तसेच संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)