रामतीर्थ न्यूज ई-पेपर
कृषी

आंबोलीत ऊस विकास चर्चासत्र संपन्न; प्रगतशील शेतकरी अशोक गुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन

संपादक - गोपाळ गडकरी • 05 November 2026, 09:48 PM

आंबोली (विशेष प्रतिनिधी) :

सावंतवाडी कृषी विभागाच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, आंबोली येथे ऊस विकास या विषयावर विशेष शेतकरी चर्चासत्र उत्साहात पार पडले. या चर्चासत्रात गवसे (ता. आजरा) येथील प्रगतशील शेतकरी अशोक महादेव गुरव यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अशोक गुरव म्हणाले, "सध्या शेतजमिनीचे घटते क्षेत्र, वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची भासणारी टंचाई या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे अत्यंत आवश्यक आहे. पारंपारिक पद्धतींना फाटा देऊन शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास एकरी उत्पादन नक्कीच वाढवता येते."

​त्यांनी आपल्या व्याख्यानात जमिनीची सुपीकता टिकवणे, ऊस लागवडीची योग्य पद्धत, रासायनिक व सेंद्रिय खतांच्या संतुलित मात्रा, ठिबक व पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन तसेच पीक संरक्षण या महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर माहिती दिली. ऊस पीक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या गुरव यांनी स्वतःच्या शेतीतील प्रयोगांचे अनुभव शेतकऱ्यांसोबत शेअर केले. व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समर्पक निरसन केले.

​या चर्चासत्रास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी अमित पाटील, संशोधक नामदेव शिरपूरकर, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच आंबोलीचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याच परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)